पुणे : देशाच्या अनेक भागांत मान्सून पुन्हा एकदा जोरदार सक्रिय झाला आहे. भारतीय हवामान विभागाने देशातील १७ राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या खोल कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पूर्व, मध्य, उत्तर आणि पश्चिम भारतातील अनेक भागांत पुढील काही तासांत विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या दरम्यान वार्याचा वेग प्रतितास ६० ते ७० किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो. याच पार्श्वभूमीवर मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पंजाब, हरियाणा, राजस्थान, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगाल, गुजरात आणि कर्नाटक या राज्यांमधील विविध भागांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. पर्वतीय राज्यांमध्ये सतत होणार्या पावसामुळे दरडी कोसळणे, भूस्खलन होणे आणि नद्या-नाले ओसंडून वाहण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. सखल भागांत पाणी साचण्याची आणि वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
नागरिकांना सतर्कतेचा इशारा
देशातील अनेक राज्यात मुसळधार पावसाची शक्यता असून विजांचा कडकडाट आणि वादळी वार्यादरम्यान नागरिक व शेतकर्यांनी आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडणे टाळावे. तसेच वादळाच्या वेळी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा आणि स्थानिक प्रशासन तसेच हवामान विभागाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. समुद्रकिनार्यावर उंच लाटा उसळण्याची आणि वेगवान वारे वाहण्याची शक्यता असल्याने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा स्पष्ट सल्ला हवामान विभागाने दिला.
मुंबईत पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता
मुंबई आणि उपनगरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून धुवाधार बरसणार्या पावसाचा जोर आता ओसरण्याची शक्यता आहे. आज, २९ जुलै रोजी मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात पावसाची तीव्रता कमी होणार असून दिवसभरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळतील, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाने मुंबई आणि आसपासच्या परिसरासाठी येलो अलर्ट कायम ठेवला असला, तरी अतिमुसळधार पावसाचा धोका टळल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.